नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यात गाजत असलेल्या शालार्थ घोटाळ्याला आता नवे वळण मिळाले असून बनावट नियुक्त्या देणाऱ्या संस्थाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. शालार्थ प्रणालीमध्ये खोटी कागदपत्रे, बनावट नियुक्ती आदेश आणि नियमबाह्य भरती प्रकरणांची गंभीर दखल घेत चौकशी यंत्रणा अधिक आक्रमक झाली आहे.प्राथमिक तपासात अनेक ठिकाणी बनावट शिक्षक व कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले असून काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी वेगाने सुरू करण्यात आली आहे.शिक्षण विभागाकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शालार्थ प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन स्तरावर कठोर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. बनावट नियुक्त्यांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याने दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

