Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानिवडक अतिक्रमणांवरच कारवाई? नगरपंचायतीच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

निवडक अतिक्रमणांवरच कारवाई? नगरपंचायतीच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत नगरपंचायतीकडून दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही ठराविक दुकानदारांवरच कारवाई करण्यात येत असून इतर अतिक्रमणधारकांवर मात्र प्रशासन मेहरबान असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुक्ताईनगर शहरातील विविध मुख्य चौक, रस्ते तसेच सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अनेक ठिकाणी दुकाने, टपऱ्या, हातगाड्या आणि अन्य व्यावसायिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावत जागा तातडीने मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत.नोटिशीत अतिक्रमण स्वखर्चाने हटवावे, अन्यथा प्रशासन स्वतः कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मात्र नोटीस बजावूनही अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, काही ठराविक व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई होत असताना इतर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “कारवाई सर्वांवर समान निकषांवर व्हावी, अन्यथा निवडक कारवाईचा आरोप अधिक तीव्र होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “शहर अतिक्रमणमुक्त करायचे असेल, तर सर्व अतिक्रमणधारकांवर समान आणि निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे. फक्त काहींवर कारवाई करून प्रशासनाने जबाबदारी झटकू नये,” अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

 

 

दरम्यान, नगरपंचायत प्रशासन आता नोटिशीप्रमाणे सर्व अतिक्रमणधारकांवर कठोर व समान कारवाई करते की केवळ निवडक कारवाईवरच समाधान मानते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या