चिनावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. ललिता हुना किरंगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्राप्रती असलेली आपली बांधिलकी जपत शाळेला तब्बल रु. १ लाख किमतीचा अत्याधुनिक डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट देत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचा नवा मार्ग खुला केला.
सौ. ललिता किरंगे यांनी सन १९८५ ते २००९ या कालावधीत नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्य करत शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शाळेला आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झाला. विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा संगम घडवत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले.त्यांच्या कार्यकाळात मुरलीधर देवराम पाटील (माजी मुख्याध्यापक), ठगू कृष्णा नेमाडे व इंदू जनार्दन भारंबे (माजी उपशिक्षक) यांनीही मोलाचे योगदान देत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या सर्व शिक्षकांच्या कार्यामुळे शाळेच्या प्रगतीचा भक्कम पाया निर्माण झाला.

अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपशिक्षक, विद्यमान मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल व नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने सौ. ललिता किरंगे यांच्यासह सर्व माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी तुषार किरंगे व त्यांचे संपूर्ण कुटुंब अमेरिकेतून विशेष उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला कौटुंबिक व भावनिक स्वरूप प्राप्त झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन होते.यावेळी खेमचंद्र गोवर्धन पाटील (चेअरमन), गोपाळ देवचंद पाटील (सचिव), राजेंद्र वामन फालक (उपाध्यक्ष), अनिल सुधाकर किरंगे (संचालक), दामोदर यादव महाजन (संचालक), गिरीश किरंगे व त्यांचे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी केले. त्यांनी सौ. ललिता किरंगे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत कृतज्ञता व्यक्त केली. हर्षाली कोल्हे यांनी डिजिटल स्मार्ट बोर्डच्या प्रभावी वापराचे महत्त्व सांगत आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सपना टोके, विनिता नारखेडे, कविता नेमाडे, मिलिंद गारसे व कविता पाटील या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना नेमाडे यांनी केले, तर संतोष आसाराम काळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व सर्व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी ऋतुजा किरंगे व सार्थक किरंगे यांनी आपल्या आजीविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या प्रेमळ स्वभाव, कर्तृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनोगतामुळे सभागृहातील वातावरण भावूक झाले.

माजी शिक्षकांचा गौरव, आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल स्मार्ट बोर्डची देणगी आणि विविध पिढ्यांना एकत्र आणणारा हा प्रेरणादायी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

