मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २९ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटारसायकली रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात उभ्या करून त्यांची विक्री करण्याची पद्धत आरोपी वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.तपासादरम्यान आरोपींविरुद्ध गुजरात राज्यातील उधना (सुरत) तसेच ठाणे, नवी मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

