जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखालील विविध मोजणी कामकाजासाठी खाजगी संस्थेमार्फत खाजगी भूकरमापक (Private Land Surveyor) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.भूमी अभिलेख विभागातील मोजणीसह तांत्रिक स्वरूपाच्या कामांना गती देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील विविध प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा अधिक कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (आयटीआय) सर्व्हेअर अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्जासाठी पात्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भूमापन, मोजणी आणि संबंधित तांत्रिक प्रक्रियेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रांसह जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती संबंधित कार्यालयातून उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे भूमी अभिलेख विभागाचे मोजणी कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित माहिती जिल्हा अधीक्षक काशिनाथ मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

