नशिराबाद परिसरातील वाकी नदीची नगरपरिषदेकडून साफसफाई; पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेतर्फे नशिराबाद परिसरातील वाकी नदीच्या पात्राची व्यापक साफसफाई करण्यात आली असून नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत सतत कामाचा मागोवा घेत हे काम पूर्णत्वास नेले. नदीपात्रातील साचलेला कचरा, प्लास्टिक, गाळ व इतर घाण हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.यावेळी नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, वाकी नदी ही शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नुकतीच नदीची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली असल्याने आता कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात प्लास्टिक, कचरा, सांडपाणी अथवा इतर घाण टाकू नये. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नशिराबाद नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे नदीपात्र मोकळे झाले असून परिसरातील दुर्गंधी, डासांचे प्रमाण तसेच आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व कचरा टाकल्यास पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो, पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो तसेच जलप्रदूषणामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय नदीतील जलचर सृष्टीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पुढे सांगितले की, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नशिराबाद नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा, नदीकिनारी घाण करू नये तसेच प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, नशिराबाद नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून भविष्यातही अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वच्छ नदी, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित शहरासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

