जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तिरंगा रॅली, शिस्तबद्ध कवायत, देशभक्तीपर गीत आणि तिरंगा प्रतिज्ञेमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन, जय दुर्गा ग्रुपचे संचालक अनिलदादा पाटील, जय दुर्गा ग्रुपचे सचिव ललितभाऊ धांडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगावचे माजी सभापती ज्ञानेश्वरदादा नाईक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन, ध्वजाला सलामी, वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि तिरंगा प्रतिज्ञेने झाली. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता तिसरी, चौथी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचालन सादर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे व गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संपूर्ण शाळेने एकत्रितपणे तिरंगा प्रतिज्ञा घेतली.तसेच इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशसेवा, शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.