मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून १९ वर्षीय युवकाच्या छातीत चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडील माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता बेलसवाडी येथील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर ही घटना घडली. मागील भांडणाच्या कारणावरून (अल्पवयीन आरोपी) रा. बेलसवाडी, याने अबुजर रफीक शेख याच्या छातीत चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.चाकूच्या वारामुळे अबुजर रफीक शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. निलेश गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.या घटनेमुळे बेलसवाडी परिसरात खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, हल्ल्यामागील कारणासह घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.