नामफलकाचे अनावरण; नशिराबादकरांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आज आदरणीय परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करणारा नामफलक मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला. या निर्णयामुळे नशिराबाद शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या नावाने नवी ओळख प्राप्त झाली आहे.परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या कार्याची, विचारांची आणि समाजाला दिलेल्या प्रेरणेची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी, या भावनेतून या नामकरणाकडे पाहिले जात आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कार्याची आणि पावन स्मृतींची प्रेरणा मिळणार असून, हा क्षण तमाम नशिराबादकरांसाठी अभिमान, आनंद आणि समाधानाचा ठरला आहे.या महत्वपूर्ण निर्णयासाठी विशेष पुढाकार, सहकार्य आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नशिराबाद नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. योगेश नारायण पाटील, उपाध्यक्ष श्री. पंकज भाऊ महाजन, सर्व विभागांचे सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव आता नशिराबादच्या मुख्य प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी झळकणार असून, त्यांच्या पावन स्मृती आणि समाजप्रेरणेला ही नामफलकाच्या माध्यमातून चिरंतन आदरांजली ठरणार आहे.