Friday, September 4, 2026
police dakshta logo
Homeजळगावयमुनेच्या लाटांशी झुंजताना खान्देशपुत्र रोहित काटे शहीद; आज कोळपिंप्री येथे अखेरचा निरोप

यमुनेच्या लाटांशी झुंजताना खान्देशपुत्र रोहित काटे शहीद; आज कोळपिंप्री येथे अखेरचा निरोप

पॅरा कमांडो प्रशिक्षणादरम्यान बोट उलटली; कोळपिंप्रीच्या वीरजवानाचे देशसेवेत सर्वोच्च बलिदान

पारोळा : हरयाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हाथिनीकुंड बॅरेजजवळ यमुना नदीत भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील वीरजवान रोहित नारायण काटे यांना वीरमरण आले. देशसेवेचे कर्तव्य बजावताना खान्देशच्या या वीरपुत्राने मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) त्यांचे पार्थिव शोधपथकाला सापडले.हरयाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हाथिनीकुंड बॅरेज येथे मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) भारतीय सैन्याच्या १ पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांचे संयुक्त ‘वॉटरमनशिप ट्रेनिंग’ सुरू होते. यावेळी प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारी सैन्याची मोटरबोट यमुना नदीतील प्रचंड पाण्याच्या प्रवाहात अडकून उलटली. बोटीत पाच जवान असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी तीन जवानांनी पोहत सुरक्षित बाहेर येण्यात यश मिळवले; तर दोन जवान वेगवान प्रवाहात वाहून गेले.हाथिनीकुंड बॅरेजच्या गेटजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह आणि निर्माण झालेले भोवरे यामुळे जवानांना सावरण्याची संधी मिळाली नाही. दुर्घटनेनंतर भारतीय सेना, भारतीय हवाई दल, एनडीआरएफ, हरयाणा व उत्तर प्रदेश एसडीआरएफ, पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकांनी युद्धपातळीवर शोध व बचावमोहीम सुरू केली. नदीचा प्रवाह कमी करण्यासाठी बॅरेजमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी करण्यात आले. तसेच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई शोधमोहीम राबविण्यात आली.

दोन दिवसांच्या अथक शोधानंतर पार्थिव सापडले.

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांहून अधिक काळ युद्धपातळीवर मोहीम सुरू होती. यमुना नदी, बॅरेज परिसर तसेच डाउनस्ट्रीम कालव्यांमध्ये विविध पथकांनी व्यापक शोध घेतला. अखेर गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) बेपत्ता असलेल्या दोन्ही पॅरा कमांडोंचे मृतदेह शोधपथकांना सापडले. यामुळे रोहित काटे यांच्या कुटुंबीयांसह कोळपिंप्री व पारोळा तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

कोळपिंप्रीत आज वीरपुत्राला अखेरचा निरोप.

शहीद जवान रोहित नारायण काटे यांची अंत्ययात्रा आज, शुक्रवार (दि. ४ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता कोळपिंप्री येथे काढण्यात येणार आहे. आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पारोळा तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रोहित काटे यांच्या शहादतीची बातमी समजताच कोळपिंप्रीसह संपूर्ण पारोळा तालुक्यावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून वीरजवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या