हद्दपार इसम, हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी; २७ संशयित वाहने ताब्यात
नशिराबाद (प्रतिनिधी) : परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पहाटे ३ ते ५.३० वाजेच्या सुमारास अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने ही मोहीम राबविली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विविध पथके तयार करून संशयित ठिकाणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईदरम्यान न्यायालयीन वॉरंट असलेल्या एका आरोपीस अटक करण्यात आली. तसेच ३ हद्दपार इसमांची तपासणी, ५ हिस्ट्रीशीटरची कसून तपासणी आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील ३ आरोपींची झडती व चौकशी करण्यात आली.दरम्यान, पहाटेच्या वेळी संशयास्पदरीत्या आढळून आलेली तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेली २७ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. अचानक राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील समाजकंटकांमध्ये धाक निर्माण झाला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच नियंत्रण ठेवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक तपासणी व कोम्बिंग मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.