जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन; प्लास्टिकमुक्त शहरासह नागरिकांच्या सहभागावर नगरपरिषदेचा भर!
नशिराबाद | प्रतिनिधी || पोलीस दक्षता लाईव्ह:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने नागरिकाभिमुख विविध उपक्रमांचा ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबरपासून होत असून, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘४-बिन वेस्ट सेग्रिगेशन’ अभियानाच्या माध्यमातून कचरा कमी करणे, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. बाजारपेठ प्लास्टिकमुक्त करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, व्यापारी व नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे.
पंधरवड्याच्या कालावधीत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, तरुणांसाठी नशामुक्तीविषयक जनजागृती, विद्यार्थी सहभागातून स्वच्छता अभियान आदी उपक्रम होणार आहेत. दिव्यांग नागरिकांना आवश्यक सहाय्य व मार्गदर्शन देण्याबरोबरच महिलांसाठीही विशेष सहाय्यता उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम, ‘विकसित भारत रन/वॉक’, महिला बचत गटांसाठी ‘वेस्ट-टू-वेल्थ’ उपक्रम तसेच सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासोबतच व्यापक स्वच्छता अभियानही राबविण्यात येणार आहे.महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन स्वच्छता क्षेत्रात कार्यरत सफाई मित्रांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेत अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज दुपारी ४ वाजता फ्रूटसेल सोसायटी, रामपेठ चौक येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांच्या सहभागातून श्रमदान करण्यात येणार असून, नशिराबादला स्वच्छ व प्लास्टिकमुक्त शहर बनविण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.