Thursday, October 1, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणस्वच्छता हाच संस्कार’चा संदेश देत नशिराबादमध्ये २ ऑक्टोबरला भव्य बाईक रॅली

स्वच्छता हाच संस्कार’चा संदेश देत नशिराबादमध्ये २ ऑक्टोबरला भव्य बाईक रॅली

सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन; रॅलीनंतर खालच्या आळी स्मशानभूमीत श्रमदानातून स्वच्छता मोहीम

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत ‘स्वच्छता हाच संस्कार’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता नगरपरिषद कार्यालय, नशिराबाद येथून सुरू होणार आहे.शहरातील विविध भागांतून मोटरसायकल रॅली काढून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त शहर तसेच दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी नागरिकांच्या हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक असणार आहेत.

या उपक्रमात नगरसेवक-नगरसेविका, सभापती, गटनेते, प्रभारी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिकांसह विशेषतः तरुणांनी स्वतःच्या मोटरसायकलींसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.बाईक रॅलीनंतर खालच्या आळी स्मशानभूमी येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, त्याच ठिकाणी या उपक्रमाची सांगता होणार आहे. ‘स्वच्छ नशिराबाद – सुंदर नशिराबाद’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन व मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.

‘स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, तर आपल्या जीवनाचा संस्कार आहे,’ या संदेशातून गांधी जयंतीनिमित्त नागरिकांनी स्वच्छतेचा संकल्प करून स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त नशिराबाद घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही नगरपरिषदेने म्हटले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या