Thursday, October 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादमध्ये विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; आसोद्यातील व्यक्तीची ओळख पटली

नशिराबादमध्ये विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; आसोद्यातील व्यक्तीची ओळख पटली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील जुन्या जीन परिसरातील शेतातील विहिरीत गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख बंडू रामराव पाटील (वय ४०, रा. इंदिरानगर, आसोदा) अशी झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नशिराबाद पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथील जुन्या जीनजवळ धीरज भगवान पाटील यांचे शेत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार निदर्शनास येताच शेतमालक धीरज पाटील यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक कार्यवाही करून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीजवळ सापडलेल्या आधारकार्डाच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटविली. बंडू पाटील हे आसोदा येथील इंदिरानगर भागातील रहिवासी असल्याचे समोर आले.मृतदेहाची अवस्था पाहता संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूची नेमकी वेळ किंवा त्यामागील परिस्थितीबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.दरम्यान, मृतदेह वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. बंडू पाटील विहिरीत नेमके कोणत्या परिस्थितीत पडले, हा अपघात आहे की अन्य कोणता प्रकार, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या