नशिराबादमध्ये मोटारसायकलवर लाऊडस्पीकर लावून दवंडी; वीजचोरी न करण्याचे नागरिकांना आवाहन
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीजचोरीला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातर्फे गावात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत मोटारसायकलवर लाऊडस्पीकर लावून गावातील विविध भागांत दवंडी देत नागरिकांना वीजचोरी न करण्याचे आवाहन करण्यात आले.या जनजागृती मोहिमेद्वारे ग्रामस्थांना वीजचोरीचे दुष्परिणाम आणि त्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली. अनधिकृतपणे वीज वापरणे, वीजजोडणीमध्ये परवानगीशिवाय बदल करणे अथवा अन्य कोणत्याही मार्गाने वीजचोरी करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वीजचोरी करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशाराही ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आला.महावितरणचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या काळात वीजचोरीसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध घालणे, अधिकृत वीजवापराला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
ग्रामस्थांनी अधिकृत वीजजोडणीद्वारेच विजेचा वापर करावा, नियमितपणे वीजबिल भरावे आणि वीजचोरीमुक्त नशिराबाद गाव निर्माण करण्यासाठी महावितरण प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातर्फे करण्यात आले. ‘वीजचोरी टाळा, कायदेशीर अडचणी टाळा!’ असा संदेश या जनजागृती मोहिमेतून देण्यात आला.

