पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सध्या समाजात वाढत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, या गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा ‘दिमाखीलाल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील युवा कलाकार, दिग्दर्शक व समाजभान जपणारे कलावंत जितेंद्र रामचंद्र वानखेडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये प्रभावी अभिनयही साकारला आहे.
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नसून, जीवनातील संकटांना धैर्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे हाच खरा मार्ग आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि कुटुंबामध्ये प्रेमळ व विश्वासाचे वातावरण निर्माण करणे किती आवश्यक आहे, हेही चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.ग्रामीण भागातील एका कलाकाराने केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचा विषय निवडून त्यावर चित्रपट निर्मिती करणे ही कौतुकास्पद बाब मानली जात आहे. साध्या परिस्थितीतून पुढे येत आपल्या मेहनत, जिद्द आणि कलागुणांच्या बळावर जितेंद्र वानखेडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘दिमाखीलाल’ हा चित्रपट प्रत्येक पालक, विद्यार्थी, शिक्षक व कुटुंबीयांनी आवर्जून पाहावा असा असून, संवेदनशील सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारी ही कलाकृती प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडते. जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत सकारात्मक विचारसरणी रुजविणारा हा चित्रपट समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे.समाजहिताचा विचार करून चित्रपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांची आजच्या काळात नितांत गरज असून, जितेंद्र वानखेडे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा तसेच सामाजिक जाणीव असलेल्या अशा कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण मातीतून उभा राहिलेला हा कलाकार आज आपल्या कलाकृतीतून समाजाला नवा विचार देत असून, त्यांची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक नवोदित कलाकारांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

