Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्या१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करीत नागपुरातून तीन परराज्यीय आरोपी जेरबंद; स्थानिक...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करीत नागपुरातून तीन परराज्यीय आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणात नागपूर येथून हरियाणा व बिहार राज्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी एका फिर्यादीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी ३१ मे रोजी कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. यावेळी आरोपी नागपूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू जसपालसिंग (वय ४२, रा. हरियाणा), भोला ऊर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (वय ४०, रा. बिहार) व राजेश पारस शहा (वय ५२, रा. बिहार) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ गव्हाणे, उमाकांत पाटील तसेच विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या