भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि समन्वयात्मक कारवाईच्या आधारे ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी फिर्यादीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी क्रमांक १ याने लोखंडी रॉड व चॉपरच्या सहाय्याने वार करून गंभीर दुखापत केली, तर इतर आरोपींनी लाकडी दांडके व हॉकी स्टिकने मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना संयुक्त तपास करून गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही विभागांच्या स्वतंत्र तपास पथकांची स्थापना करण्यात आली.तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कुंदन अनिल पठारे (वय १९, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (वय २१, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) याला अटक केली.विधीसंघर्षित बालकास बाल निरीक्षक, जळगाव यांच्या समक्ष हजर करण्यात आले असून त्याबाबतची पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावत उल्लेखनीय कामगिरी केली.भुसावळ बाजारपेठ राहुल वाघ, यांचनेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसउपनिरीक्षक शरद वागल, पो.हे.का.गोपाल गव्हाळे, पो.हे.का उमाकांत पाटील, पो.ना.विकास सातदिवे, पो.का.प्रशांत परदेशी, पो.का.राहुल वानखेड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो.हे.का. विजय नेरकर, पो.हे.का.रमन सुरळकर पो.हे.का.कांतीलाल केदारे, पो.हे.का. रविंद्र भावसार, पो.ना सोपान पाटील, पो.कॉ योगेश माळी, प्रशात सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जितेंद्र विटकर, जिवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकात रायपुरकर या पथकाने उत्कृष्ट अशी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

