Monday, April 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ बसस्थानकात ३.२० लाखांची सोन्याची पोत चोरी; महिला आरोपी ताब्यात

भुसावळ बसस्थानकात ३.२० लाखांची सोन्याची पोत चोरी; महिला आरोपी ताब्यात

डी.बी. पथकाची कारवाई; २२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असताना एका ज्येष्ठ महिलेची पर्स लंपास करून त्यातील ३ लाख २० हजार रुपये किंमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत चोरणाऱ्या महिला आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी कुसुम देविदास चौधरी (वय ६२, रा. शिवराय नगर, मुक्ताईनगर) या दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ३.२० लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली होती. याप्रकरणी दि. २६ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी डी.बी. पथकास अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून ३.२० लाख रुपये किंमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या