धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील वंजारी खपाट येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या शेतात वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून उभ्या मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी सुमारे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड होऊन ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली. या आगीत सुमारे ८० आर क्षेत्रातील मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलाठी इफ्तार देशमुख यांनी पंचनामा करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला. यावेळी महावितरणचे कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, वीजवाहिन्यांमधील शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना परिसरात अधूनमधून घडत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ नुकसानभरपाई देण्याची तसेच धोकादायक वीजतारा दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

