दोन नि:शुल्क शिबिरांत ४७२ महिलांचा सहभाग; १६ स्वयंसेवकांचे उल्लेखनीय योगदान
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एकल महिलांच्या विविध समस्या, गरजा तसेच शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक त्या सुविधा व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सैयद वासिफ अली निसार अली (वासिफ सर) यांच्या पुढाकाराने एकल महिला सर्वेक्षण सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत ६ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या शिबिरात १२० महिलांनी नि:शुल्क सर्वेक्षण फॉर्म भरून सहभाग नोंदविला. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी आयोजित दुसऱ्या शिबिरालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५२ महिलांनी सर्वेक्षण फॉर्म भरले. दोन्ही शिबिरांत मिळून तब्बल ४७२ महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.दोन्ही शिबिरे पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्यात आली होती. सर्वेक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काही महिलांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी शिबिरस्थळी नि:शुल्क झेरॉक्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे महिलांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न घेता सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करता आली.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक वासिफ सरांच्या टीममधील १६ स्वयंसेवकांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिश्रम घेतले. महिलांना सर्वेक्षण फॉर्म भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी स्वयंसेवकांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती योग्य पद्धतीने संकलित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.“जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. समाजातील गरजू घटकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,” अशी भावना नगरसेवक सैयद वासिफ अली निसार अली (वासिफ सर) यांनी व्यक्त केली.