प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांचा आंदोलनाचा इशारा; अडचणी आल्यास नगरपरिषदेकडून सहकार्याचे आश्वासन
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबादजवळील तरसोद बोगद्याच्या परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नशिराबाद नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.तरसोद बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, पंधरा दिवसांच्या आत या समस्येवर ठोस मार्ग काढावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.दरम्यान, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडत, पंधरा दिवसांच्या कालावधीत या समस्येवर तोडगा न निघाल्यास नशिराबाद नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आंदोलन करतील, असा इशारा दिला.समस्येवर उपाययोजना करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून काही अडचणी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर पंकज महाजन यांनी, शहराच्या विकासाच्या कामात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही. उपाययोजना करताना आवश्यक सहकार्याची गरज भासल्यास नगरपरिषदेकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.तरसोद बोगद्याजवळील पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन कायमस्वरूपी तोडगा निघणार का, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.