जळगाव | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून मिळावे, शेतीची प्रक्रिया समजून घेता यावी आणि शेतकरी व कृषी क्षेत्राविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांच्या वतीने विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन विविध पिकांची पाहणी केली. पिकांची ओळख, लागवडीची प्रक्रिया, मातीची मशागत, पाणी व्यवस्थापन, पिकांची निगा तसेच शेतीतील विविध कामांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. शिक्षकांनी मातीचे महत्त्व, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक आणि पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शेतातील पिकांचे बारकाईने निरीक्षण करत कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न विचारून माहिती घेतली. सेंद्रिय व पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे कृषीविषयक पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना शेतीची प्रक्रिया, शेतकऱ्यांचे कष्ट व योगदान तसेच अन्ननिर्मितीमागील श्रम यांची जाणीव झाली. प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नोत्तर आणि सामूहिक सहभागामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, जिज्ञासा, संवादकौशल्य, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण आणि पर्यावरणीय जाणीव विकसित होण्यास मदत झाली.‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावरच कृषीशिक्षणाचा प्रत्यक्ष धडा घेतला. ‘शेती समजून घेऊया, निसर्ग जपूया आणि शाश्वत भविष्य घडवूया’ हा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि अनुभवाधारित विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कृषी क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची तसेच शिस्तीची योग्य काळजी घेत क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पाडली.