Saturday, September 5, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषदेवर ५० ते ६० महिला-पुरुषांचा मोर्चा; प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या जागेला नागरिकांचा...

नशिराबाद नगरपरिषदेवर ५० ते ६० महिला-पुरुषांचा मोर्चा; प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या जागेला नागरिकांचा तीव्र विरोध

पूर्वनिश्चित जागा बदलून नवीन ठिकाणी बांधकामाचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाला स्थगिती देण्याची मागणी

नशिराबाद : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत नशिराबाद नगरपरिषदेमार्फत भवानी नगर परिसरातील बेळी रस्त्यालगत प्रस्तावित करण्यात आलेल्या २० सीट सार्वजनिक शौचालयाच्या जागेवरून नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पूर्वी निश्चित करण्यात आलेली जागा बदलून अन्य नवीन जागेवर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप करीत भवानी नगर परिसरातील सुमारे ५० ते ६० महिला व पुरुष नागरिकांनी नशिराबाद नगरपरिषदेवर मोर्चा काढून सामूहिक हरकत अर्ज सादर केला.मुख्याधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने नागरिकांनी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक आझाद पटेल यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. प्रस्तावित नवीन जागेवरील बांधकामास तात्काळ स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

₹३१ लाख ८४ हजार ९८७ रुपयांचे काम…
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत काम क्र. २ म्हणून भवानी नगर भागातील बळी रस्त्यालगत २० सीट सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी अंदाजित ₹३१,८४,९८७ इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.या कामासंदर्भात नशिराबाद नगरपरिषदेचा प्रशासकीय ठराव क्र. ३६९ दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, कार्यरंभ आदेश दिनांक २ फेब्रुवारी २०२६ तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव यांची तांत्रिक मान्यता क्र. ७३९/२०२५ दिनांक १३ मार्च २०२५ यांचा निवेदनात संदर्भ देण्यात आला आहे.

पूर्वनिश्चित जागा बदलण्याचे कारण काय?
नागरिकांचा मुख्य आक्षेप असा आहे की, सार्वजनिक शौचालयासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेली जागा बदलून आता नवीन ठिकाणी बांधकामाची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. मात्र, जागा बदलण्याचा निर्णय कोणत्या ठरावाने, आदेशाने अथवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने घेण्यात आला, याबाबत स्पष्टता नसल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.मंजूर प्रस्ताव, अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यतेतील जागा आणि प्रत्यक्ष बांधकामाची प्रस्तावित जागा वेगळी असल्यास हा मंजूर कामातील मूलभूत बदल ठरू शकतो. त्यामुळे नवीन जागेसाठी स्वतंत्र स्थळ पाहणी, साइट प्लॅन, तांत्रिक तपासणी तसेच आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

‘पूर्वी येथे मोठा नाला होता’; भरावाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह?
नागरिकांनी प्रस्तावित नवीन जागेच्या स्वरूपाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या ठिकाणी पूर्वी मोठा नाला असल्याचे सांगत, त्या नाल्यात सुमारे १५ ते १८ फूट भराव करण्यात आला असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.अशा भरावाच्या जागेवर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, बांधकामासाठी आवश्यक जमीन स्थिरता व सुरक्षितता तपासण्यात आली आहे का, तसेच भविष्यात या बांधकामाच्या टिकाऊपणाची खात्री काय, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

दुर्गंधी, सांडपाणी आणि आरोग्याच्या प्रश्नाची भीती..
नवीन जागेवर सार्वजनिक शौचालय उभारल्यास परिसरात दुर्गंधी,सांडपाण्याची समस्या, घाण व डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही या जागेची योग्य तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच प्रस्तावित जागा रस्त्यालगत असल्यास पादचारी व वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, रस्त्याची विद्यमान रुंदी, भविष्यातील रस्ता रुंदीकरण तसेच विकास आराखड्याच्या दृष्टीनेही जागेची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या निकषांची पडताळणी करण्याची मागणी!
सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला नागरिकांचा विरोध नसून योग्य ठिकाणी आणि नियमानुसार बांधकाम व्हावे, अशी भूमिका निवेदनातून स्पष्ट करण्यात आली आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या आवश्यकतेचा विचार करताना संबंधित परिसरातील सार्वजनिक गरज, उघड्यावर शौच किंवा लघवी होणारी ठिकाणे तसेच नागरिकांना सहज उपलब्धता यांचा विचार केला जातो. त्यामुळे नवीन जागेची निवड कोणत्या सर्वेक्षणाच्या किंवा निकषांच्या आधारे करण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्याची मागणी…
नागरिकांनी नगरपरिषदेकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत—

– नवीन प्रस्तावित जागेवर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ थांबवावे.
– नवीन जागेवरील कामास स्थगिती आदेश द्यावा.
– पूर्वी निश्चित केलेली जागा आणि सध्याची प्रस्तावित जागा यांची संयुक्त स्थळ पाहणी करावी.
– नवीन जागेची तांत्रिक सुरक्षितता व जमीन स्थिरतेची तपासणी करावी.
– सार्वजनिक आरोग्य, सांडपाणी, वाहतूक व पर्यावरणीय परिणामांचा अहवाल तयार करावा.
– स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जागेची निवड झाली आहे का, याची पडताळणी करावी.
– परिसरातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय बांधकाम सुरू करू नये.
– चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदारास खोदकाम, बांधकाम किंवा बांधकाम साहित्य टाकण्यास परवानगी देऊ नये.
– मंजूर जागेऐवजी अन्य जागेवर काम केल्यास शासन निधीच्या वापराबाबत आवश्यक वित्तीय तपासणी करावी.

नागरिकांचा इशारा; आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार!
नागरिकांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक शौचालयाच्या संकल्पनेला त्यांचा विरोध नसून पूर्वी निश्चित केलेली जागा सोडून नवीन जागेवर बांधकाम करण्यास त्यांची सामूहिक हरकत आहे.निवेदन देऊनही प्रस्तावित जागेवरील बांधकाम सुरू ठेवण्यात आल्यास भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(a) व 19(1)(b) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषण अथवा जनआंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.दरम्यान, सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव; नगरपरिषद प्रशासन शाखा, जळगाव; नशिराबाद नगरपरिषदेचा संबंधित नगररचना/बांधकाम विभाग; नगराध्यक्ष तसेच बांधकाम विभागाच्या सभापती यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.आता नगरपरिषद प्रशासन या सामूहिक हरकतीवर कोणती भूमिका घेते, प्रस्तावित नवीन जागेची तांत्रिक व प्रशासकीय वैधता तपासली जाते का आणि बांधकामाला स्थगिती दिली जाते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या