६८५ युवतींचा सहभाग; १५ दहीहंड्यांवर महिला खेळाडूंचे प्रेरणादायी पोस्टर
जळगाव | प्रतिनिधी :- भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’चा थरार शनिवारी (दि. ५) शिवतीर्थ मैदानावर रंगणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत होणाऱ्या या सोहळ्यात नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचे दर्शन आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवता येणार आहे.या उपक्रमात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांमधील १५ महिला गोविंदा पथकांतील तब्बल ६८५ युवती सहभागी होणार आहेत. किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय, के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल. एच. पाटील पब्लिक स्कूल, के. के. इन्स्टिट्यूट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी संस्थांचा सहभाग राहणार आहे.सहभागी युवतींच्या सुरक्षिततेला आयोजकांनी प्राधान्य दिले असून, प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. युवतींनी मानवी मनोरे उभारण्यासाठी कसून सराव केला असून, साहसी कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.
दहीहंडीच्या उंचीवर महिला खेळाडूंची प्रेरणादायी छायाचित्रे
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या १५ दहीहंड्यांवर भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. दहीहंडी ज्या उंचीवर असेल, त्याच उंचीवर हे पोस्टर राहणार असून, देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंच्या कर्तृत्वातून सहभागी युवतींना प्रेरणा मिळावी, हा यामागील उद्देश आहे.
स्पर्धेपेक्षा समान संधीला प्राधान्य
‘युवतींची दहीहंडी’ हा केवळ स्पर्धात्मक कार्यक्रम नसून समता आणि समान संधीचा उत्सव असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहभागी सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मैदानावर १५ स्वतंत्र दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.
६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके
मागील वर्षी समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकांची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत…
उडाण फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, ग्लडियेटर डान्स क्लासेस, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल आणि एल. एच. पाटील पब्लिक स्कूलतर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले जाणार आहे. के. के. इन्स्टिट्यूट ऑफ योगा, एकलव्य मल्लखांब अकॅडमी आणि रुद्र योगातर्फे रोप मल्लखांब व योगनृत्याचे सादरीकरण होईल. कु. कल्याणी महाजन व श्रीराम गुरूकूलतर्फे मर्दानी खेळ सादर केला जाणार आहे. नागपूरच्या सुनिता मौर्य व महिमा मौर्य हुला हूप नृत्य, तर पुण्याचे कामत काका रशियन शैलीतील नृत्य सादर करणार आहेत.
२१३ ढोलवादकांचा दणदणाट अन् लेझर शो
‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादकांच्या दमदार वादनाने शिवतीर्थ मैदान दणाणून जाणार आहे. मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक आतषबाजी ही कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत. शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही उत्सवात सहभाग राहणार आहे.हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, स्वागत समितीच्या सदस्या रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, मीनल जैन, हेमांक्षी वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.