मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा एल निनोचा प्रभाव देशातील हवामानावर स्पष्टपणे जाणवणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत त्याची तीव्रता सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील, मात्र उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) अधिक प्रमाणात येऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून कृषी व जलस्रोत व्यवस्थापनासाठी ही बाब चिंताजनक मानली जात आहे. एल निनोच्या परिणामामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेती आणि पाणी उपलब्धतेवर होऊ शकतो.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या मते, जर सकारात्मक ‘आयओडी’ (Indian Ocean Dipole) स्थिती विकसित झाली, तर एल निनोच्या नकारात्मक परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे पुढील काही महिन्यांतील हवामान घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

