नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील पेठ परिसरात श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त साजरा होणारा पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. काही वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे खंडित झालेली ही परंपरा गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून, यंदाही भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
काल बुधवार रोजी सायंकाळी “येळकोट येळकोट जय मल्हार” आणि “खंडेराव महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगत उमेश दिलीप धनगर यांनी पेठ येथील खंडेराव महाराज मंदिरापासून गावसीमेपर्यंत बारा गाड्या ओढत परंपरेचे पालन केले. हा थरारक सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पेठ परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. विस्मृतीत गेलेल्या या सांस्कृतिक परंपरेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले.

