जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूरस्थिती, बुडण्याच्या दुर्घटना तसेच अन्य आपत्कालीन प्रसंगांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जळगाव प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे तसेच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा पोलीस दल, महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, मनपा आरोग्य विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे विशेष शोध व बचाव साहित्य प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता पार पडलेल्या या सराव सत्राचा मुख्य उद्देश मान्सून काळात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये बचाव पथकांची सज्जता तपासणे हा होता. यावेळी शोध व बचाव साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच पूरस्थिती किंवा पाण्यात बुडालेल्या व्यक्तींच्या बचावासाठी बोटीच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचे सादरीकरण करण्यात आले.ही प्रात्यक्षिके मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ आणि केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, यश अहिरे, अजय पाटील, दीपक चौधरी, १०८ ॲम्बुलन्स चालक संदीप गवले, डॉ. मोईन शेख, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता साळी साहेब, हर्षल नेते, फायरमन योगेश कोल्हे, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, जगदीश साळुंखे, किरण पाटील, राकेश सोनवणे, विकी सोनवणे आदी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र शासनातर्फे जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ८७ पोलीस चौक्यांना वितरित करण्यात आलेल्या आपत्कालीन बचाव साहित्य किटच्या वापराबाबत उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महावितरणच्या आपत्कालीन पथकाकडून विजेच्या तारांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्या सुरक्षित पद्धतीने कशा कापल्या जातात, याचेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पावसाळ्यात अतिवृष्टी अथवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते, याचे सादरीकरण या सरावातून करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जळगाव मनपा प्रशासन व बचाव पथके पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

