जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हिंदू धर्मात दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. या पवित्र मासात दीपदान, तप, स्नान तसेच भगवान पुरुषोत्तम यांच्या कथा श्रवणाला विशेष महत्त्व दिले जाते. अधिकमासानिमित्त मन्यारखेडा येथील श्री बदरीनाथ मंदिर संस्थानात भाविक मोठ्या संख्येने तिर्थकुंड स्नानासाठी उपस्थित राहत आहेत.मन्यारखेडा येथे असलेल्या श्री बदरीनाथ मंदिर संस्थान परिसरात विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भारतातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांमधील जल व माती आणण्यात आली असून, १२ ज्योतिर्लिंग, अष्टवैकुंठ, चारधाम तसेच विविध पवित्र नद्यांचे जल तिर्थकुंडात समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय हरिद्वार येथून आणण्यात आलेले सुमारे १५०० लिटर पवित्र जलही या तिर्थकुंडात सोडण्यात आले आहे.या पवित्र तिर्थकुंडात स्नान करण्यासाठी अधिकमासात भाविकांची मोठी गर्दी होत असून, भाविक ग्रह-राशी-नक्षत्र मंदिराचे दर्शन घेऊन धार्मिक लाभ घेत आहेत.अधिकमासानिमित्त मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तीन दिवसीय अधिकमाहात्म्य कथा तसेच श्रीमद भागवताच्या दशम स्कंदावरील तीन दिवसीय कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच अधिकमासभर भगवानांचे विशेष अभिषेक व धार्मिक कार्यक्रम नियमित सुरू आहेत.
सर्व जळगावकरांनी या पवित्र तिर्थकुंड स्नानाचा व मंदिर दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बदरीनाथ मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

