Thursday, May 7, 2026
police dakshta logo
Homeमुक्ताईनगरमुक्ताईनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड प्रभाग क्रमांक १३ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिकांचा...

मुक्ताईनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड प्रभाग क्रमांक १३ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिकांचा संताप अनावर

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना अस्वच्छतेच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा संकलनाची गाडी परिसरात न फिरकल्याने घरासमोर कचऱ्याचे ढिगारे साचले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.नगरपंचायत प्रशासन केवळ कर वसुलीकडे लक्ष देत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिसरातील गटारींची सफाई केल्यानंतर त्यातील कचरा रस्त्यावरच टाकण्यात आला असून तो उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रभागातील अनेक गटाऱ्या फुटलेल्या अवस्थेत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे व गवत वाढलेले दिसून येत आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.“फक्त कर भरण्यासाठीच आम्ही नागरिक आहोत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा सुरू असून प्रत्यक्षात नगरपंचायत पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तात्काळ कचरा उचलून फुटलेल्या गटाऱ्यांची दुरुस्ती करावी तसेच नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या