जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकाला शनिदोष काढून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने अंगठी व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास गजानन विठोबा सर्जराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे जळगाव बसस्थानक परिसरात उभे असताना एक इसम त्यांच्याजवळ येऊन शेगावला जाणाऱ्या बसबाबत विचारणा करू लागला. त्यानंतर त्याने संभाषणात गुंतवून आपल्या साथीदारास खडा आणण्यास सांगितले. हातचलाखी करून त्या खड्याचा रुद्राक्ष तयार केल्याचे भासवण्यात आले.यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना बसस्थानकातील एका कोपऱ्यात नेऊन “तुमचा शनिदोष काढून देतो” असे सांगत भुलथापा दिल्या व त्यांच्या हातातील अंगठी तसेच रोख रक्कम घेऊन पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.त्यावरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली.तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी करण्यात आली. याचवेळी संशयित आरोपी नगरदेवळा, ता. पाचोरा येथे असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरदेवळा येथून अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. निपाणी रोड, वखारजवळ, नगरदेवळा, ता. पाचोरा) तसेच मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, नागद रोड, चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हे शाखेत आणून सखोल चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांचा साथीदार सद्दाम मदारी हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद वागळ, सफौ. अतुल बंजारी, पोहेका विजय पाटील, अकरम शेख, नितीन वाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनचे दिनेश पाटील, जळगाव आरपीएफचे पंकज बाघ तसेच नेत्रमचे मुबारक देशमुख, पंकज खडसे व कुंदनसिंग व्यास यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

