Thursday, May 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमहळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक जेरबंद; एक जिवंत काडतूस जप्त

हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक जेरबंद; एक जिवंत काडतूस जप्त

कासोदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ताडे (ता. एरंडोल) येथे आयोजित हळदी समारंभात कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या युवकाला कासोदा पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मे २०२६ रोजी ताडे येथे हळदी समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून अनेक पाहुणे आले होते. त्यामध्ये लखन प्रकाश वाघ हाही उपस्थित होता. रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास बँडवर नाचत असताना काही नागरिकांना त्याच्या कमरेला गावठी कट्टा (अग्निशस्त्र) लावलेला दिसून आला. याबाबत उपस्थितांनी विचारणा करताच त्याने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लखन वाघ हा पुन्हा ताडे गाव परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे.माहितीची खातरजमा करून कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी निलेश गायकवाड, योगेश पाटील व सोनू पाचंद यांच्या पथकाने भातखेडे चौफुली परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या