एक आरोपी जेरबंद, दुसरा फरार
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड बदलत खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर आरोपींनी धुळे, नंदुरबार, मालेगाव आदी विविध शहरांतील एटीएममधून तक्रारदारांच्या खात्यातून तब्बल २ लाख ३१ हजार रुपये काढून फसवणूक केली.या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून विशेष पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी तसेच गुप्त माहितीदारांकडून माहिती संकलित करून तपास सुरू केला.तपासादरम्यान धुळे येथे सापळा रचून एटीएम सेंटरमध्ये नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या टोळीतील शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) यास ताब्यात घेण्यात आले.तर त्याचा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा फरार असून त्याच्याविरुद्ध मुंबई व नवी मुंबई परिसरातील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी, कापूरबावडी आदी ठिकाणी फसवणुकीचे दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार प्रविण मांडोळे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, राहुल बैसाणे तसेच पोलीस अंमलदार राहुल कोळी व विलास गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

