पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अधिक मासानिमित्त शिरसाळा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक घटना मुक्ताईनगरात घडली. एका भरधाव ट्रक चालकाने दुचाकीस्वारांना जोरदार कट मारल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर संतप्त नागरिक व दुचाकीस्वारांनी संबंधित ट्रकचा पाठलाग करत मुक्ताई चौक-बोदवड चौफुली येथे ट्रक अडवला. चालकाला खाली उतरून विचारपूस करण्यास सांगितले असता त्याने वाहनातून बाहेर येण्यास नकार दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले.नागरिकांचे म्हणणे आहे की, चालकाच्या संशयास्पद वर्तनामुळे ट्रकची सखोल तपासणी होणे आवश्यक होते. मात्र काही स्थानिक मध्यस्थांनी हस्तक्षेप करून चालकाचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला आणि ट्रकला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ट्रकमध्ये नेमका कोणता माल होता? तपासणी का झाली नाही? चालक खाली उतरायला का तयार नव्हता? अशा प्रश्नांची चर्चा शहरभर रंगली आहे.विशेष म्हणजे, घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला अनेक वेळा फोन केल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.या संपूर्ण प्रकारामुळे मुक्ताईनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनी शहरातून अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप केला असून, संबंधित ट्रक व चालकाची चौकशी करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी होत आहे.
“कट मारून अपघात घडविण्याचा प्रयत्न की काहीतरी लपविण्याचा?”
ट्रक चालकाच्या वर्तनामुळे आणि ट्रकची तपासणी न झाल्याने नागरिकांमध्ये संशय अधिकच बळावला असून, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

