Saturday, April 18, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यआठ तासांत मुख्यमंत्री सहायता निधीचा निर्णय; रुग्णालयातूनच अर्ज, थेट खात्यात मदत

आठ तासांत मुख्यमंत्री सहायता निधीचा निर्णय; रुग्णालयातूनच अर्ज, थेट खात्यात मदत

रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार; ऑनलाइन प्रणालीमुळे उपचारासाठी निधी तत्काळ उपलब्ध

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही.अवघ्या आठ तासांत मदतीचा निर्णय घेऊन निधी थेट संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तेथूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. संबंधित रुग्णालय आपल्या लॉगिन आयडीद्वारे रुग्णाची माहिती व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करेल. ही कागदपत्रे तत्काळ स्कॅन होऊन मंत्रालयात पाठवली जातील.पूर्वी अर्जाची छाननी होण्यासाठी अनेक दिवस लागत असत. मात्र आता तातडीच्या प्रकरणांमध्ये केवळ आठ तासांच्या आत निर्णय घेतला जाईल. यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबण्याची वेळ येणार नाही.अर्जाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जाची स्थिती रुग्णाच्या नातेवाईकांना एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. तसेच, डिजिटल स्वाक्षरीसह मदतीचे पत्र थेट रुग्णालयाला पाठवले जाईल.

राज्यातील नोंदणीकृत सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर आणि अखंडित उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या