नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV (Human Papilloma Virus) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत सुमारे 100 मुलींचे यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरणानंतर कोणत्याही मुलीला कोणतीही दुष्परिणाम (reaction) आढळलेली नाही, त्यामुळे पालकांमध्ये विश्वास वाढला आहे.
या लसीकरणाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, 15 वर्षांपूर्वी लस घेतल्यास केवळ एकच डोस आयुष्यभरासाठी HPV विषाणूपासून संरक्षण देतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या Gardasil-4 लस उपलब्ध असून, हीच लस खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या किंमतीत दिली जाते. मात्र, भारत सरकारकडून ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थीला शासकीय मान्यताप्राप्त लसीकरण प्रमाणपत्र (certificate) देखील दिले जात आहे.या मोहिमेत नशिराबादमधील किशोरी मुली व त्यांच्या पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे.
या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथील डॉ.गौरव जाधव आणि डॉ.अजय पाल यांची टीम विशेष परिश्रम घेत आहे.

