Sunday, November 22, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअभय योजनेचा नशिराबादमध्ये प्रभावी लाभ; ४० हजार ९५० रुपयांची थकबाकी अवघ्या ३३०...

अभय योजनेचा नशिराबादमध्ये प्रभावी लाभ; ४० हजार ९५० रुपयांची थकबाकी अवघ्या ३३० रुपयांत निकाली!

तब्बल ९९ टक्क्यांहून अधिक रकमेचा दिलासा; पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा – सहायक अभियंता पवन वाघुळदे यांचे आवाहन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:-महावितरणकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’चा नशिराबाद शहरात प्रभावी लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. या योजनेअंतर्गत शहरातील रमेश श्रावण चौधरी यांनी तब्बल ४० हजार ९५० रुपयांच्या जुन्या वीजबिलाच्या थकबाकीपैकी केवळ ३३० रुपये भरून थकबाकीचा निपटारा केला आहे. त्यामुळे त्यांना ४० हजार ६२० रुपयांचा दिलासा मिळाला असून, एकूण थकबाकीच्या सुमारे ९९.२ टक्के रकमेची सवलत मिळाली आहे. रमेश चौधरी यांचा वीजपुरवठा यापूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. त्यांच्याकडे वीजबिलाची ४० हजार ९५० रुपये थकबाकी प्रलंबित होती. मात्र, महावितरणच्या अभय योजनेत सहभागी झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार त्यांनी केवळ ३३० रुपये भरले आणि जुन्या थकबाकीतून मुक्त होण्याचा लाभ घेतला. या उदाहरणामुळे अनेक वर्षांपासून वीजबिलाची थकबाकी प्रलंबित असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना किती फायदेशीर ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे अभय योजना २०२६-२७?

महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या पात्र बिगरशेती ग्राहकांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा कालावधी ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ असा आहे. योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना थकीत वीजबिलावरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास पात्रतेनुसार २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. ग्राहकांना नियमानुसार हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर २०२६ पूर्वी संपूर्ण पात्र रक्कम एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना विशेष तत्पर भरणा सवलतीचा लाभ मिळणार आहे. पुनर्जोडणीच्या वेळी पात्र ग्राहकांनी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारल्यास अतिरिक्त ५ टक्के सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पात्र ग्राहकांना पुनर्जोडणी शुल्कातूनही सूट मिळणार आहे. ३१ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या पात्र बिगरशेती लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या तात्पुरता वीजपुरवठा खंडित ग्राहकांनाही योजनेत सहभागी होता येणार आहे. मात्र, कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

पात्र ग्राहकांनी संधीचा लाभ घ्यावा – पवन वाघुळदे

नशिराबाद शहर कक्षाचे सहायक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांनी शहरातील सर्व पात्र घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक वर्षांपासून वीजबिलाची थकबाकी प्रलंबित असल्याने ज्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे, अशा ग्राहकांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी आहे. व्याज व विलंब आकारामुळे मूळ थकबाकीच्या रकमेत मोठी वाढ झालेली असते. मात्र, अभय योजनेमुळे अशा ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. त्यामुळे नशिराबाद शहरातील पात्र ग्राहकांनी आपली थकबाकी तपासून योजनेच्या अटी व शर्तींची माहिती घ्यावी आणि निर्धारित कालावधीत नोंदणी करून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या