Friday, November 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादच्या विकासासाठी CSR निधी मिळविण्याचा प्रयत्न; औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत नगराध्यक्षांची बैठक

नशिराबादच्या विकासासाठी CSR निधी मिळविण्याचा प्रयत्न; औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत नगराध्यक्षांची बैठक

शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्याची मागणी; प्रदूषण, दुर्गंधी आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कंपन्यांना स्पष्ट सूचना

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (CSR) प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने नशिराबाद नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील विकासकामांसाठी CSR निधीतून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यासह औद्योगिक प्रदूषण, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सध्या निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने CSR निधीतून विशेष तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी बैठकीत केली. याशिवाय शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुधारणा आणि सार्वजनिक ठिकाणांचा विकास यासाठी औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आर्थिक सहकार्य करावे, याबाबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, औद्योगिक कंपन्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दाही बैठकीत ऐरणीवर आला. भाग्यवर्धन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या अशुद्ध पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. उद्योग आणि व्यापाराचे स्वागत आहे; मात्र उद्योग-व्यवसाय करताना नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यावसायिकाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.अदाणी सिमेंट कंपनीतून हवेत पसरणाऱ्या सिमेंटच्या धूलिकणांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. धूलिकणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सक्शन मशीन बसवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना भाजपा गटनेते व नगरसेवक लालचंद भाऊ पाटील यांनी मांडली. नागरिक आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

तसेच समृद्धी केमिकल कंपनीकडून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त वासामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी कंपनीच्या मालकांना भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये आणि दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.या बैठकीस लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोनवणे, भाजपा गटनेते लालचंद भाऊ पाटील, सभापती चेतन भाऊ बऱ्हाटे, अस्लम सर, वासिफ अली सर, बापू दादा बोढरे, सचिन भाऊ महाजन, विकास भाऊ धनगर, ॲड. इक्बाल भाऊ यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.औद्योगिक कंपन्यांच्या वतीने श्रीराम पाईप व सिका ई-बाईकचे श्रीराम दादा पाटील, हिरा रोटोचे धनंजय खडके, समृद्धी केमिकल प्रा. लि.चे प्रतिनिधी, सद्गुरू पाईपचे प्रियदर्शन अमृत गुर्जर, अदाणी सिमेंटचे मोरे साहेब, भाग्यवर्धन पॉलीफ्लेक्सचे ललित धनगर, खोशल प्लास्टोचे नारखेडे दादा आणि विजय ॲग्रोचे नरेंद्र सोमाणी यांच्यासह विविध कंपन्यांचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून नशिराबाद शहराच्या विकासाला चालना मिळावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि औद्योगिक प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळावे, या उद्देशाने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या