नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्यास उपनगराध्यक्षपदावर भाजपचा दावा; लालचंद पाटील, कीर्तिकांत चौबे यांची नावे चर्चेत!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान नगराध्यक्षपद भाजपकडे असताना आता हे पद शिवसेनेकडे जाण्याच्या चर्चेला वेग आला आहे. अशा परिस्थितीत उपनगराध्यक्षपदावरही शिवसेनेचाच दावा राहणे योग्य नसून, युतीधर्मानुसार उपनगराध्यक्षपद भाजपला मिळाले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका नशिराबाद नगरपरिषदेचे पाणीपुरवठा तसेच जलनीत्सारण सभापती कीर्तिकांत चौबे यांनी मांडली आहे.त्यांनी ‘पोलीस दक्षता लाईव्ह’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून नशिराबादमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. “भाजपचा नगराध्यक्ष रजेवर जात असेल आणि त्या जागी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असेल, तर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचा प्रबळ दावा आहे,” असे कीर्तीकांत चौबे यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष शिवसेनेचा, मग उपनगराध्यक्षही शिवसेनेचाच का?
महायुतीतील सत्तासमीकरणाचा विचार करता नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आणि उपनगराध्यक्षपदही शिवसेनेकडे राहणे योग्य ठरणार नाही, असा मुद्दा चौबे यांनी उपस्थित केला. नशिराबाद नगरपरिषदेतील सत्तास्थापनेच्या वेळी भाजपने नगराध्यक्षपदासाठी इतर महत्त्वाची पदे शिवसेनेला देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता सत्तेतील समतोल राखण्यासाठी उपनगराध्यक्षपद भाजपला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“भाजपने नगराध्यक्षपदासाठी बाकी सर्व पदे सेनेला बहाल केली होती, हे विसरता कामा नये,” अशी स्पष्ट भूमिका चौबे यांनी मांडली.
भाजपमध्येही प्रबळ दावेदार..!
उपनगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते तसेच प्रबळ दावेदार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच नशिराबाद नगरपरिषदेचे भाजपचे गटनेते लालचंद पाटील आणि पाणीपुरवठा सभापती कीर्तिकांत चौबे यांची नावे सध्या अधिक चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.नगराध्यक्षपदाचे सत्तासमीकरण बदलल्यास उपनगराध्यक्षपदाची निवडही भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी पक्षांतर्गत आणि महायुतीतील चर्चांना आगामी काळात वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपनगराध्यक्ष निवड व सत्तासमीकरणे
नगराध्यक्षपदाच्या संभाव्य बदलासोबतच उपनगराध्यक्षपदाचा प्रश्नही ऐरणीवर आल्याने नशिराबादच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण आकार घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून उपनगराध्यक्षपदासाठी दावा करण्यात आल्याने या निवडीवर मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः भाजपमध्ये जेष्ठ नेते लालचंद पाटील आणि कीर्तिकांत चौबे यांची नावे चर्चेत असल्याने पक्षांतर्गत समीकरणे, महायुतीतील समन्वय आणि अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होतो, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
‘युतीधर्म’ पाळणार का?
नशिराबाद नगरपरिषदेतील आगामी सत्ताबदलाच्या चर्चेत आता नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आणि उपनगराध्यक्षपद भाजपकडे असे संतुलित समीकरण निर्माण होते का, हा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. भाजपकडून उपनगराध्यक्षपदावर दावा करण्यात आल्याने महायुतीतील वरिष्ठ नेते यावर काय तोडगा काढतात, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाचा संभाव्य बदल, उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचा दावा आणि इच्छुक दावेदारांची वाढती संख्या पाहता नशिराबाद नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आगामी काही दिवसांत आणखी वेग येण्याची शक्यता आहे.मात्र नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून, सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे राजकीय सूत्रांवर आधारित आहेत.