Sunday, June 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यारस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याची तक्रार दुर्लक्षित?; बेलव्हाळ ग्रामस्थांचा संताप, पावसापूर्वी डांबरीकरणाची...

रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याची तक्रार दुर्लक्षित?; बेलव्हाळ ग्रामस्थांचा संताप, पावसापूर्वी डांबरीकरणाची पुन्हा मागणी!

सुनसगाव | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- सुनसगाव ते बेलव्हाळ मार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आजही हा रस्ता अपूर्ण अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.सुरुवातीला सुनसगाव ते बेलव्हाळ या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असतानाच बेलव्हाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनिषा जितेंद्र खाचणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशीची मागणी केली होती.

ग्रामस्थांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सरपंच पती जितेंद्र खाचणे यांनी घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली होती.त्यावेळी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया न करता केवळ खडी टाकून त्यावर डांबराचा थर देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला होता.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्ता तयार होत असतानाच काही ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भविष्यात हा रस्ता अधिक खराब झाल्यास वाहनधारक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम थांबवावे अथवा काम उत्कृष्ट दर्जात पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी सरपंच सौ. मनिषा खाचणे व ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तसेच आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, येथून बेलव्हाळ, सुनसगाव, वराडसीम, निमगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. रस्ता अपूर्ण आणि खराब अवस्थेत असल्याने वाहनांचे टायर पंक्चर होणे, वाहनांचे नुकसान होणे तसेच पादचाऱ्यांना गैरसोय सहन करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.याबाबत ठेकेदाराला विचारले असता डांबर महाग झाल्याने मिळत नसल्याचे कारण सांगीतले जात असल्याचे बेलव्हाळ सरपंच यांनी सांगितले.आता जो पर्यंत डांबर मिळणार नाही तो पर्यंत या परिसरातील नागरिकांनी या खराब रस्त्याचा वापर करावा का? पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा संबंधितांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या