भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद – बोदवड रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असल्याने या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते तसेच बऱ्याचदा वाहनचालक बेभान होवून वाहने चालवताना दिसतात त्यामुळे सुनसगाव जवळ गतीरोधक व मोरीला कठडे बसविण्यात यावेत अशी मागणी सुनसगाव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी केली आहे.प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , दि.२८ मे रोजी दुपारी वराडसीम येथील आरती भारंबे व उमाकांत भारंबे हे दांपत्य खेडी जळगाव येथून पापड तयार करून वराडसीम येथे वाहनाने जात असताना त्यांच्या वाहनाला दुधलगाव ता मलकापूर येथील ओमनी चालकाने समोरासमोर धडक दिली धडक एवढी भयानक होती की यात जळगाव येथे उपचारा दरम्यान आरती भारंबे यांचे निधन झाले तर पती उमाकांत भारंबे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुनसगाव – बेलव्हाळ चौफुलीवरील अपघाती मोरी !
या सुनसगाव – बेलव्हाळ बायपास चौफुलीवर वराडसीम , बेलव्हाळ, गोजोरे, सुनसगाव , गोंभी येथील नागरीक थांबलेले असतात.या ठिकाणी गोजोरे व नशिराबाद गावाकडून गतीरोधक बसवणे गरजेचे आहे तसेच या ठिकाणी मोरी बांधण्यात आली आहे त्या मोरीला कोणतीही प्रकारचे कठडे नाही त्यामुळे या ठिकाणी सुध्दा मोरीच्या खड्ड्यात पडून अपघाती घटना घडू शकते त्यामुळे रस्त्याच्या संबंधित अधिकारी तसेच सुनसगाव व बेलव्हाळ येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या बाबत संबंधित रस्ता अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर गतीरोधक व मोरीला कठडे बसविण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा सुनसगाव – बेलव्हाळ चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे सुनसगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी कळविले आहे.

