नशिराबाद मधील विकासकामांना मिळत आहे वेग!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातून वाहणाऱ्या वाकी नदीच्या स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामाला सध्या वेग आला असून या मोहिमेवर नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) स्वतः लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा तसेच नागरिकांना संभाव्य पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपंचायतीमार्फत आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नदी स्वच्छता उपक्रमाला नव्याने चालना मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कामाच्या गुणवत्तेसह त्याच्या वेळेत पूर्ततेवरही नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा विशेष भर असल्याचे दिसून येत आहे.प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देणारी कार्यशैली ही नगराध्यक्ष पाटील यांची ओळख मानली जाते. शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचा ते नियमित आढावा घेत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन सतर्क राहावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमधून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने वाकी नदी स्वच्छता मोहीम महत्त्वाची ठरत असून या कामामुळे आगामी काळात नागरिकांना निश्चितच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

