जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विविध रखडलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघाच्या वतीने २२ जून रोजी पुणे येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन औंध येथील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.संघटनेच्या मते, राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यक ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये पशुधन विकास, कृत्रिम रेतन सेवा, पशुरोग प्रतिबंध, दुग्ध व्यवसाय वृद्धी तसेच पशुपालकांना मार्गदर्शन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्यासंदर्भातील विधेयकास तातडीने मान्यता देणे, बोव्हाईन ब्रीडिंग कायद्यात आवश्यक सुधारणा करून संबंधित पदविका अभ्यासक्रमांचा समावेश करणे, तसेच कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना आवश्यक साहित्य, योग्य मानधन आणि विमा संरक्षण उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचना प्रक्रियेत निर्माण झालेल्या पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, तसेच राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत राबविण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रमांना शासनाची अधिकृत मान्यता मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या मागण्यांची पूर्तता झाल्यास केवळ पदविकाधारकांनाच न्याय मिळणार नाही, तर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
राज्यभरातील पदवीधारकांना संघटनेचे आवाहन
राज्यभरातील पदविकाधारक पशुवैद्यकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक लोखंडे यांच्यासह डॉ. शंकर झोपे, डॉ. संदीप भालेराव, डॉ. सोपान दुट्टे, डॉ. योगेश सूर्यवंशी, डॉ. विकास नवले, डॉ. दिपक शेवाळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. विवेक अडकमोल, डॉ. बाळू राठोड आणि सल्लागार डॉ. संजय पाटील (धुळे) यांनी केले आहे.“पदविकाधारकांना न्याय, पशुसंवर्धन क्षेत्राला नवी दिशा” आणि “मान्यता, नोंदणी व रोजगार हा आमचा हक्क” या घोषणांद्वारे संघटनेने आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे.

