भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भुसावळ येथील निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल 20 लाख रुपयांत फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रकरण कसे घडले?
भुसावळचे सुरेश रघुनाथ धांडे (वय 65) यांना अचानक फोन आला. समोरच्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत धांडेंच्या बँक खात्यात दहशतवाद्यांचे पैसे जमा झाल्याची खोटी माहिती दिली. “तुमचे अटक वॉरंट निघाले आहे” असे सांगून भीती दाखवली. यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे “डिजिटल अरेस्ट” दाखवण्यात आले. कॉलदरम्यान सरकारी इमारतींचे फोटो, भारताचा तिरंगा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दृश्ये असे खोटे सेटअप दाखवण्यात आले. धांडे यांचा आधार क्रमांक, बँक डिटेल्स व इतर माहिती घेऊन मानसिक दबाव टाकला गेला.
पैशांची लूट
२२ सप्टेंबर रोजी धांडेंकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण २० लाख रुपये फिक्स डिपॉझिट मोडून मोबाईल बँकिंगद्वारे पाठवून घेण्यात आले. सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून “बाहेर जाऊ नका, कोणाशी बोलू नका” अशा धमक्या देण्यात आल्या. सात दिवस सतत डिजिटल अरेस्ट करून धांडे दाम्पत्याला मानसिक छळ दिला.
गुन्ह्याची जाणीव
२२ सप्टेंबर रोजी शेवटी व्हिडिओ कॉल बंद झाला. त्यानंतर धांडे दाम्पत्याला फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ भुसावळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिस तपास
भुसावळ सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. वरिष्ठ निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
नागरिकांना इशारा
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणत्याही अपरिचित व्यक्तीला बँक डिटेल्स किंवा आधार क्रमांक देऊ नये. व्हिडिओ कॉल किंवा फोनवर “डिजिटल अरेस्ट” किंवा पोलिस असल्याचे सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.

