Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादहरविलेला युवक जगन्नाथपुरीतून सुखरूप परत : नशिराबाद पोलिसांच्या कौतुकास्पद कार्यवाहीने पालकांना दिलासा

हरविलेला युवक जगन्नाथपुरीतून सुखरूप परत : नशिराबाद पोलिसांच्या कौतुकास्पद कार्यवाहीने पालकांना दिलासा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मिसींग केस दाखल असलेला १८ वर्षीय युवक जय संजयकुमार जावरे (रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) याचा शोध तब्बल दोन महिन्यांनी लावण्यात नशिराबाद पोलीसांना यश आले आहे. हरविलेल्या मुलाचा शोध घेत त्याला जगन्नाथ पुरी (ओडिशा राज्य) येथून सुखरूप परत आणण्यात आले असून या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.

दि. १७ जुलै २०२५ रोजी जय हा कोणास काहीही न सांगता नशिराबाद येथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील संजयकुमार जावरे यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला मिसींगची नोंद केली होती. घटनेनंतर संबंधित युवकाने आपला मोबाईल क्रमांक बंद केल्याने त्याचा मागोवा घेणे अशक्य झाले होते. प्राथमिक चौकशीत कोणताही धागादोरा न मिळाल्याने प्रकरण गुंतागुंतीचे झाले होते.

या तपास कामात मा. पोलीस अधीक्षक रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नेमण्यात आले. या पथकात सहा. फौज. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल, पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे व पो.कॉ. प्रकाश कोळी यांचा समावेश होता.

तपासादरम्यान युवकाच्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती मिळवण्यात आली. त्याचे विश्लेषण करताना तो ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नशिराबाद पोलीस तपास पथकाने सायबर पोलीस स्टेशनकडून पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, पो.हे.कॉ. दिलीप चिंचोले, पो.ना. सचिन सोनवणे व पो.कॉ. दीपक सोनवणे यांची तांत्रिक मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील अंमलदार दोन दिवस जगन्नाथ पुरी येथे मुक्काम ठोकून अथक परिश्रमाने युवकाचा शोध घेत अखेर २० सप्टेंबर २०२५ रोजी त्याला सुखरूप ताब्यात घेतले व पालकांच्या स्वाधीन केले.

सदर कार्यवाही हे नशिराबाद पोलिसांचे धाडस, चिकाटी व सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. यशस्वी तपासाबद्दल मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी संपूर्ण तपास पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या