Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeअपघातनशिराबाद टोल नाक्याजवळील बस अपघात ; महिलेच्या मृत्यू प्रकरणी बस चालकावर गुन्हा...

नशिराबाद टोल नाक्याजवळील बस अपघात ; महिलेच्या मृत्यू प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) या महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची एस.टी. बस (क्र. एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावहून भुसावळकडे प्रवास करत असताना नशिराबाद टोल नाक्याजवळ अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटला. टायर फुटल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस भरकटत टोल नाक्याजवळील भिंतीवर जोरदार धडकली. अपघाताचा धक्का इतका जबरदस्त होता की, बसमधील प्रवासी घाबरून गेले. यावेळी बसमध्ये प्रवास करणाऱ्या साराबाई भोई या धक्क्यामुळे खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने त्या बसच्या मागील चाकाखाली चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू केली. मयत महिलेचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मृत महिलेचा मुलगा किरण गणेश भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक किशोर रामचंद्र जावळे (रा. भुसावळ) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या