Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावात राजकीय भूकंप : दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश..!

जळगावात राजकीय भूकंप : दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश..!

शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का ; शहरातील राजकीय समीकरणात उलथापालथ..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाल्याचे चित्र दिसून आले. दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-उबाठा पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत जी.एम. फाऊंडेशन येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात माजी महापौर नितीन लड्ढा, माजी महापौर सौ. जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान बाजार समिती सभापती सुनील महाजन यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेश सोहळ्यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. केतकी पाटील आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी “भाजपचा विजय असो”, “गिरीशभाऊ पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.या प्रवेशामुळे आगामी जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद लक्षणीय वाढणार असून शिवसेना-उबाठा गटात गोंधळ उडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. शहरातील राजकारणात नव्या समीकरणांची पायाभरणी आज झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

राजकीय वर्तुळात आता हा प्रवेश “महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गेम चेंजर ठरणार का?” या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या