Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमसोनसाखळी लांबविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना रावेर पोलिसांकडून अटक

सोनसाखळी लांबविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना रावेर पोलिसांकडून अटक

१ डिसेंबर रोजी रावेर येथे झालेल्या सोनसाखळी चोरीचा उलगडा ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहर व परिसरात महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी लांबविण्याच्या घटना घडवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रावेर गुन्हे शोध पथकानंे शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे १ डिसेंबर रोजी रावेर शहरात झालेल्या चोरीचा उलगडा झाला असून, कु-ऱ्हाा–काकोडा येथील जुनी घटना देखील उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१ डिसेंबर २०२५ रोजी वाघोड येथील शोभाबाई सुरेश पाटील (वय ४७) या कर्जीत फाट्यावरून पायी जात असताना लाल-काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या चेहऱ्यावर माती फेकून गोंधळ निर्माण केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तोडून आरोपी पळून गेले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपींची रेकी करताना दिसलेली दुचाकी, प्रवासाचा मार्ग व त्यांच्या शरीरयष्टीचा सुगावा पोलिसांना मिळाला. तांत्रिक माहितीच्या आधारे अजय गजानन बेलदार (वय २०) व नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०, दोघे रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांची ओळख पटवण्यात पथक यशस्वी ठरले.

पोलिस पथक अंतुल गावात पोहोचले तेव्हा आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली. मात्र, पथकाने शेतात तळ ठोकून हालचालींवर लक्ष ठेवले. काही तासांनी आरोपी गावात परतल्याचे कळताच पोलिसांनी नरवेल रोडवर पाठलाग करून दोघांनाही पकडले. चौकशीत आरोपींनी ३ नोव्हेंबर रोजी कु-ऱ्हाा–काकोडा बसथांब्यावर १० ग्रॅम सोनसाखळी चोरीची कबुली दिली.कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ७५ हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी व १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पो.उप.नि. तुषार पाटील, तसेच गुन्हे शोध पथकातील कल्पेश आगोदकर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे व सायबर सेलचे मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पो.उप.नि. तुषार पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या