भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात रविवारी (४ जानेवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत कार थांबवून बाहेर उडी घेतल्यामुळे त्याचा थोडक्यात बचाव झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी विकी साबणे हे आपल्या MH-19-CF-3778 क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते. काही वेळापूर्वीच त्यांनी पेट्रोल पंपावरून इंधन भरले होते व ते घराकडे निघाले होते. बसस्थानक परिसरात येताच कारच्या इंजिनमधून अचानक प्रचंड धूर निघू लागला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली व बाहेर उडी घेतली.चालक बाहेर पडताच काही क्षणांतच कारने भीषण पेट घेतला. भररस्त्यात जळती कार दिसताच परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.या आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी व भरवस्तीत ही घटना घडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

