जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचे आज स्पष्ट झाले. मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या अधिकृत आरक्षण सोडतीत हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे आगामी महापौर कोण असणार याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला निर्णायक बहुमत मिळाले आहे. निवडणूक निकालानुसार भारतीय जनता पक्षाने ४६ जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेने २२ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना ५ जागा मिळाल्या असून, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या अपक्षाने नंतर शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ ७० वर पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली असून विरोधकांची संख्या मर्यादित राहिली आहे.
दरम्यान, काल नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महायुतीची अधिकृत गटनोंदणी पूर्ण झाली. भाजपकडून प्रकाश बालाणी यांची गटनेतेपदी, तर शिवसेनेकडून विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला हे आरक्षण निश्चित झाले आहे.त्यामुळे आता याच प्रवर्गातील महिला उमेदवार महापौरपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले असून, सत्ताधारी पक्षात इच्छुकांमधील हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.

